बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद, राबडी, तेजस्वी यादवांना धक्का, आयआरसीटीसी घोटाळ्याचा आरोप

Foto
नवी दिल्ली: बिहार निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडी देवी आणि पुत्र तेजस्वी यादव यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. दिल्लीतील राउज ॲव्हेन्यू कोर्टाच्या विशेष सीबीआय न्यायालयाने आयआरसीटीसी घोटाळा आणि नोकरीसाठी जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात तिघांविरुद्ध आरोप निश्‍चित करण्याचा निर्णय दिला आहे.

कोर्टाच्या या निर्णयामुळे आता लालू कुटुंबीयांवरील खटला औपचारिकरित्या सुरू होणार आहे. लालू यादव हे आरोग्याच्या कारणांमुळे व्हीलचेअरवर कोर्टात दाखल झाले, तर हे प्रकरण बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर घडले असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. 

विशेष सीबीआय कोर्टाने या प्रकरणात अत्यंत कठोर निरीक्षणे नोंदवली. कोर्टाने स्पष्ट केले की, माजी रेल्वे मंत्री लालू यादव यांनी टेंडर प्रक्रियेत हस्तक्षेप केला होता आणि त्या प्रक्रियेत मोठे बदल घडवून आणले होते. हा सर्व प्रकार लालू यादव यांच्या माहितीने आणि त्यांच्या सरकारी पदाचा दुरुपयोग करून करण्यात आला. जमीन राबडी आणि तेजस्वी यादव यांच्या नावावर करण्याचा हा मोठा घोटाळा होता, असे कोर्टाने म्हटले.

या तिघांविरुद्ध फसवणूक, भ्रष्टाचार आणि पदाचा दुरुपयोग करण्याच्या विविध कलमांखाली आरोप निश्‍चित करण्यात आले आहेत. कोर्टाने लालू यादव यांना विचारले असता, त्यांनी मी दोषी नाही असे उत्तर दिले. या घोटाळ्यात लालू, राबडी आणि तेजस्वी यांच्यासह अनेक सरकारी अधिकारी आरोपी आहेत. 

बिहार निवडणुकीच्या वेळी दुहेरी संकट


हे प्रकरण बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याच्या पार्श्‍वभूमीवर घडले आहे. आरजेडीने महागठबंधनमध्ये काँग्रेसला 52 जागा देण्याचा प्रस्ताव दिला असला, तरी काँग्रेसने 60 जागा मागितल्याने दोघांमधील तणाव वाढला आहे. बिहार काँग्रेस नेत्यांनी चर्चा थांबवली असून, आज दिल्लीत होणाऱ्या काँग्रेसच्या केंद्रीय निवड समितीच्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. लालू यादव आणि तेजस्वी यादव हे दिल्लीतील मुलगी मीसा भारती यांच्या पांडारा पार्क येथील निवासस्थानी थांबलेले आहेत. तेजस्वी यादव यांची दिल्ली उड्डाणात अखिलेश यादव यांच्याशी झालेली भेट सिट शेअरिंगच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची शक्यता आहे.